MRF Dividend 2025 : टायर उत्पादक क्षेत्रातील दिग्गज कंपनी एमआरएफने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर २०२५) दमदार आर्थिक निकाल सादर केले आहेत. यासोबतच, कंपनीने आपल्या शेअरधारकांसाठी लाभांशाची घोषणा केली आहे. एमआरएफच्या बोर्डाने १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरवर ३ रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. लाभांशासाठी २१ नोव्हेंबर २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे, तर लाभांशाचे वितरण ५ डिसेंबर २०२५ किंवा त्यानंतर केले जाईल.
नफ्यात ११.७% ची वाढ
कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. रिपोर्ट केलेल्या तिमाहीसाठी कंपनीचा नफा वार्षिक आधारावर ११.७ टक्क्यांनी वाढून ५२५.६४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो ४७०.७० कोटी रुपये होता. कंपनीचा ऑपरेशनल रेव्हेन्यू ७.२ टक्क्यांनी वाढून ७,३७८.७२ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी ६,८८१.०९ कोटी रुपये होता. कंपनीचा EBITDA (व्याज, कर, घसारा आणि कपातीपूर्वीचा नफा) १२ टक्क्यांनी वाढून १,०९० कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या नफ्याच्या मार्जिनमध्येही सुधारणा दिसून आली आहे. EBITDA मार्जिन ६० बेसिस पॉईंट्सने वाढून १५ टक्के झाला आहे.
शेअरची कामगिरी
शुक्रवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर दुपारी ३ वाजता एमआरएफचे शेअर्स १,५७,५०० रुपयांच्या भावावर (०.५१% घसरणीसह) व्यवहार करत होते. कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात दमदार परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरने ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एमआरएफचे मजबूत तिमाही निकाल आणि लाभांशाची घोषणा यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढण्याची शक्यता आहे.
